''कला'' ही अर्थपूर्ण मुल्य व तत्वांनी संस्कारित केलेला शोध असतो, व ''कलाकृती'' त्या कलाकाराच्या जाणिवा व संवेदनाचा अविष्कार असतो, त्यात मूर्त किंवा अमूर्त स्वरूपात वैयक्तिक, सामाजिक व सांस्कृतिक मूल्यांचा विचार व्यक्त होत असतो. हा विचार ज्या शैलीने व्यक्त होतो ती त्या व्यक्तीची किंवा कलाकाराची ओळख असते व तो कलाकार ती शैली विविध प्रायोगिक, वैचारिक, भावनिक, आंदेलनाव्दारे तसेच दृकसाक्षरतेव्दारे विकसीत व विस्तारीत करतो, यश, अपयश ही त्या आंदोलनात्मक मंथनाचा परिपाक असतो, या अस्तित्वाच्या संघर्षात तो सातत्याने सक्रीय होवून वर्षानुवर्षे लढत असतो, हा इतिहास आहे.
कला समीक्षक, अभ्यासक आपल्या दृष्टीक्षेपातून, आकलनशक्तीच्या आणि बौध्दिक श्रीमंतीच्या आधारावर त्याच्या अस्तित्वाचे मूल्यमापन करीत असतो व त्याच्या अस्तित्वाला स्विकारतो व मान्यता देतो.
कला महाविद्यालये हे कला शिक्षणाचे साचेबध्द अभिसर्जन करू शकत नाही. कला शिक्षणाचे मुल्य संस्कारित करणे हे त्या महाविद्यालयाच्या शिक्षकवृदांच्या गर्भित अनुभव, संचित भावविश्व व वैचारिक प्रगल्भतेवर अवलंबून असते. त्या प्रतिभासंपन्न शिक्षकाच्या प्रतिभेचे पडसाद विद्यार्थ्यांच्या कलाकृतीवर उमटतात व प्रभावीत होतात हे सर्वश्रृत आहे. काही विद्यर्थी याला अपवादही ठरतात व ते स्वतःची वैचारिक मूल्ये व जाणिवा वेगळया शैलीव्दारे विस्तारीत करीत असतात व शिक्षकही त्याला प्रोत्साहित करून त्याचा अभिव्यक्ती व अभिरूचीचे समर्थनही करतात
नवीन मुल्ये सर्जित करणे, प्रयोगशिलता विस्तारीत करणे, नवीन आकारांना व रंगाना भाषा व अर्थ प्रदान करणे त्या भाषेला नवीन अर्थाने सर्जित व अर्थबोधन करण्यात तो सातत्याने प्रयत्नशिल असतो. नाविण्यपूर्ण पैलूंनी एक वेगळी दृष्य भाषेची पुनर्रचना करीत असतो.
प्रयत्नांना अपयश नसते, मान्यतेला विलंब होवू शकतो पण यश उशिरा का होईना मिळतेच, हे सत्य आहे व सर्वश्रृत आहे, याला इतिहास साक्ष आहे. श्रम, सातत्य व कलेचा अभ्यासपूर्ण जाणिवा हे कलाकाराच्या यशाचा आधार आहे व प्रयोगशिलता, नाविण्यता ही यशाची वैयक्तिक ओळख आहे.
प्रा. हेमंत नागदिवे
माजी कलासंचालक,
महाराष्ट्र राज्य, मुंबई
अभ्यासिलेल्या कलाघटकांची मूलभुत कलातत्वाची सखोल गर्भचिंतनातून अर्थबोधित विवेचनात्मक विचारधारेची, इन्द्रियाला जाणवणारी भावस्पर्शी संवेदनशीलतेची, दृश्यरूपाने अविष्कृत झालेली सर्जनशील रचना म्हणजे कलाकृती.
प्रा. हेमंत नागदिवे